नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता विकोपाला पोहोचलं आहे. रशियाने युक्रेनच्या रहिवाशी भागातही सैन्य घुसवल्याने युक्रेनमधील परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे प्रत्येक देश आपआपल्या देशातील नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारातने या प्रकरणात शांततापूर्ण चर्चा करून तोडगा काढण्याचा सल्ला दिलेला असताना आता चीननेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना फोन केला. जिनपिंग यांनी पुतिन यांना युक्रेनसोबत वाटाघाटी करण्याचा सल्ला दिला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करून या संकटावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना वाटाघाटीसाठी आमंत्रित केले आहे. कारण रशियाने आपली लष्करी कारवाई सुरू ठेवली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे सैन्य ईशान्य आणि पूर्वेकडून युक्रेनची राजधानी कीवजवळ येत आहे. तर युक्रेनच्या सैन्याने लढाई थांबवली की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी सांगितले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील सविस्तर वृत्त दिलं आहे.