मुंबई – वानखेडे स्टेडियमवरील आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा झालेला दारुण पराभव हा मुंबई इंडियन्सने केला नाही, तर गायब झालेल्या विजेने केला, असा घणाघात भारताचा माजी सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) केला.
मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करणारा चेन्नईचा संघ १६ षटकांत केवळ ९७ धावांवर गारद झाला. त्यानंतर मुंबईने १४.५ षटकात ५ गड्यांच्या बदल्यात या सामन्यात विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला काही काळ वीज नव्हती. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा बंद होती. तेव्हा डेवॉन कॉन्वे वादग्रस्त पद्धतीने पायचीत झाला. म्हणून या सामन्यात चेन्नईचा मुंबईने नव्हे, तर लाईटने पराभव केला, अशा शब्दांत सेहवागने बीसीसीआयला सुनावले. या सामन्यासाठी जनरेटरचा वापर का केला नाही, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. स्टेडियमवरील जनरेटर फक्त लाईटसाठीच आहे का? इतर यंत्रणांसाठी त्याचा वापर होऊ शकत नाही का? असे अनेक प्रश्न त्याने उपस्थित केले.