मुंबई- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर मुंबईतील चैत्यभूमीवर महाराष्ट्र व इतर राज्यांतून येणा-या अनुयायांसाठी खाद्यपदार्थांचे वाटप करताना मुंबई महापालिका आणि संबधित पोलीस ठाण्यामध्ये नोंदणी करावी असे आवाहन जी-उत्तर विभागाचे पालिका सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.
महापरिनिर्वाण दिनाला येणा-या अनुयायांना अनेक इच्छुक विविध सामाजिक संस्थांमार्फत खाद्य वितरण करण्यात येते. त्यामुळे संबंधित संघटन,संस्था तथा व्यक्तींनी पालिकेच्या जी-उत्तर विभाग (सहायक अभियंता परिरक्षण) व छत्रपती शिवाजी महाराज मैदान, पोलिस ठाणे (मुंबई) यांना रविवार ४ डिसेंबरपूर्वी लेखी स्वरुपात नोंदणी करावी असे आवाहन सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी केले आहे. तसेच अनुयायांसाठी खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.यामध्ये प्राचार्य एम. एम. पिंगे चौक,राजाबढे चौक लगत,ट्रॉफिमा हॉटेलच्या बाजुला छत्रपती शिवाजी महाराज मैदान, एस.एच.परळकर मार्ग (विष्णू निवासजवळ) आणि पद्माबाई ठक्कर,वेस्ट साईडच्या मागे अनुयायांना खाद्यपदार्थ वितरण केले जाणार आहे.त्यामुळे अन्न सुनियंत्रित पद्धतीने वितरण करणे,वितरणाकरीता येणा-या वाहनांचे नियंत्रण करणे,तसेच सुयोग्य प्रकारे कचरा संकलन करणे सोपे जाईल.दरम्यान मुंबई पालिकेच्यावतीने दरवर्षी प्रसिद्ध केल्या जाणार्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सोमवार ५ डिसेंबर रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अशा १ लाख पुस्तिकांचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे.