सॅन फ्रान्सिस्को :
जगभरातील अनेक देशांमध्ये आज दुपारी ४ च्या सुमारास ट्विटर डाऊन झाले. ट्विटरचे अनेक यूजर्स त्यांच्या पेजवर कोणतेही नवीन ट्वीट पाहू शकत नव्हते. याबाबत शेकडो वापरकर्त्यांनी आपल्या तक्रारी सोशल मीडियावर व्यक्त केल्या. इलॉन मस्क यांनी मालकी घेतल्यापासून आतापर्यंत चौथ्यांदा ट्विटर डाऊन झाले.
या आधी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला, ट्विटरची सेवा काही तासांसाठी बंद झाली होती. त्यावेळीही यूजर्संना कोणताही नवीन मेसेज दिसत नव्हता किंवा ते कोणतीही नवीन पोस्ट करु शकत नव्हते. इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून ट्विटर प्लॅटफॉर्म अनेक वेळा तांत्रिक समस्यांना बळी पडले आहे आणि काहीवेळा तासनतास डाऊन झाले आहे. प्लॅटफॉर्म डाऊन झाल्यामुळे ट्विटरवरून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यूएस, युके , जपान आणि भारतातील वापरकर्त्यांना ट्विटर फीड आणि ट्विट पोस्ट करताना समस्या जाणवल्या. सोशल मीडियावर वापरकर्त्यानी ट्विटर वापरता येत नसल्याची तक्रार केली. ट्विटर बंद होण्यामुळे काही जणांच्या व्यवसायावर आणि कामावर देखील परिणाम झाला.