नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठा ‘द रॉक’ या हिऱ्याची एका लिलावात विक्री झाली आहे. या पांढऱ्या शुभ्र ‘द रॉक’ या हिऱ्याची जिनिव्हामध्ये पार पडलेल्या लिलावात १८.८ दशलक्ष डॉलर म्हणजेच १ अब्ज, ४३ कोटी, ८६ लाख, ३८ हजार, ४० रुपयांमध्ये विक्री झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या आकाराचा हा हिरा मात्र कोणी विकत घेतला याची माहिती आयोजकांनी दिलेली नाही.
क्रिस्टीच्या लिलावगृहातील दागिने विभागाचे प्रमुख मॅक्स फॉसेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘द रॉक’ हा जगाील सर्वात मोठ्या आकाराचा पांढरा हिरा आहे. हा हिरा २२८.३१ कॅरेटचा असून आकाराने एका गोल्फ बॉलपेक्षा मोठा आहे. या जिनेव्हा येथील क्रिस्टीच्या लिलावगृहामध्ये या हिऱ्याचा लिलाव नुकताच पार पडला. आठ वर्षेनंतर हा हिरा विकण्याचा विचार करण्यात आला. जेंव्हा बोली लागली तेंव्हा पाच जण उपस्थित होते. यातले तीन जण अमेरिकेतील तर इतर दोघे मध्यपूर्वेतील होते. जीनिव्हातील क्रिस्टीज ज्वेलरीचे तज्ञ् मॅक्स फोसेट म्हणाले, हा जगातील अत्यंत दुर्मिळ हिरा आहे. दागिन्यांच्या संग्रहातही तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. हा हिरा आपल्याकडे असावा अशी अनेकांची इच्छा होती. त्याच्या खरेदीसाठी अनेकांनी बोली लावली होती अखेर हा हिरा आता विकला गेला आहे. १४ दशलक्ष फ्रँकपासून सुरू झालेली बोली दोन मिनिटांनंतर ११.६ दशलक्ष फ्रँकवर थांबली. हा हिरा २००० च्या दशकाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतील एका खाणीतून काढण्यात आला होता. जिनेव्हामध्ये लिलाव होण्यापूर्वी हा हिरा दुबई, तैपेई आणि न्यूयॉर्कमध्ये नेण्यात आला होता.