टोकियो – जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. स्थानिक वेळेनुसार आज सकाळी ११.३० वाजता नारा शहरातील जाहीर सभेत भाषण करताना हल्लेखोराने त्यांच्यावर २ गोळ्या झाडल्या. त्यातील एक मानेवर आणि एक छातीत गोळी लागून ते जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे ६ तास त्यांनी मृत्युशी झुंज दिली. परंतु शेवटी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तेत्सुया यामागामी (४१) याला पोलिसांनी अटक केली आहे.
जपान संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील सदस्यांची निवडणूक रविवारी आहे. त्यासाठी नारा शहरात सभेचे आयोजन केले होते. माजी पंतप्रधान शिंजो आबे या सभेत भाषण करत होते. तेव्हा त्यांच्यावर गोळीबार झाला. हल्लेखोराने पाठीमागून २ गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी मानेला आणि एक छातीत लागली. हल्ल्यात जखमी झालेले आबे जागीच कोसळले. सभेत भाषण करताना दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे तिथे गोंधळ उडाला. सुरक्षारक्षकांनी हल्लेखोराला तात्काळ अटक केली. त्याच्याकडून बंदुक जप्त केली. त्याने हा गोळीबार का केला त्याची माहिती मिळालेली नाही. वर्मी गोळ्या लागल्याने आणि मोठा रक्तस्राव झाल्यामुळे आबे यांची प्रकृती चिंताजनक बनली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या सर्व प्रकारामुळे त्यांच्या शरीराची हालचाल बंद पडली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. परंतु शेवटी ६ तासांची झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे रविवारी होणारी निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शिंजो आबे यांच्यावर झालेल्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिंजो आबे यांच्या निधनाविषयी दुःख व्यक्त केले आहे. शिंजो आबे यांनी प्रकृतीच्या कारणावरून पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. भारत आपला सर्वात विश्वासू मित्र असल्याचे त्यांनी २०१८ मध्ये मोदींच्या दोन दिवसीय जपान दौऱ्यात बोलताना सांगितले होते. २०२१ मध्ये शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले होते.