श्रीनगर -उधमपूर जिल्ह्याजवळ सोमवारी सकाळी भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर शेकडो वाहने अडकून पडली, त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्याशी जोडणाऱ्या देवल येथे पहाटे २.४५ वाजता भूस्खलन झाले, असल्याचे वृत्त समोर आले आहे.
दरम्यान, वाहतूक राष्ट्रीय महामार्ग वरिष्ठ पोलीस अधीक्षक शाबीर अहमद मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ता सफाई एजन्सीचे कर्मचारी आणि मशीनच्या मदतीने रस्त्यावर पडलेला दरडीचा ढीग हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न केले सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महामार्ग बंद असल्याने, काल सकाळपासून जम्मू किंवा श्रीनगरच्या महामार्गावर कोणत्याही वाहनाला परवानगी दिली जात नव्हती. ट्रक तसेच मोठ्या प्रमाणात काही प्रवासी वाहने अडकली आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, नाकाबंदीमुळे जम्मू-किश्तवार-डोडा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. कारण हा मार्गही समरोलीतून जातो. त्यामुळे श्रीनगर आणि डोडा-किश्तवाडसह चिनाब खोऱ्याकडे निघालेल्या शेकडो प्रवासी वाहनांना नागरोटा बायपास आणि नरवालसह विविध ठिकाणी थांबवावे लागले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तर सतत होणाऱ्या हिमवृष्टीमुळे येथे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे काझीगुंड-बनिहाल सेक्टरमध्ये ताज्या हिमवृष्टीमुळे आणि रामबनमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे बंद झालेला महामार्ग देखील रविवारीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. एसएसपी म्हणाले की, जम्मूकडे जाणारे ३०० ट्रक वगळता शेकडो वाहने रविवारी त्यांच्या स्थानी पोहोचली होती.