कोल्हापूर – येथील सर्वात जुन्या आणि हजारो चित्रपटांचा साक्षीदार असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याची माहीती उघडकीस आली. ज्या कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापूरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओचे व्यवहार रद्द करा आणि तो चित्रीकरणासाठी पुन्हा सुरु करावा, आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, कलाकार आणि कोल्हापूरकरांच्या वतीने जयप्रभा स्टुडिओ समोर आज सकाळी दहा वाजल्यापासून साखळी उपोषण करण्यात आले.
यावेळी जयप्रभा स्टुडिओ खरेदीकर्त्यांच्या कार्यलयावर आंदोलनकर्त्यांनी शाईफेक केली. यावेळी कोल्हापूरकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी पहिला फिल्म कॅमेरा कोल्हापुरात तयार केला. चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांनी जयप्रभामध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. असं असताना या स्टुडिओची विक्री झाली ही धक्कादायक गोष्ट आहे. या प्रकरणातील व्यवहार रद्द करावेत, आणि स्टुडिओमध्ये चित्रीकरणासाठी परवानगी दिल्याशिवाय हे उपोषण मागे घेणार नसल्यचा इशारा यावेळी देण्यात आला.
या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, कलाकार व तंत्रज्ञांनी आजपासून स्टुडिओच्या दारात साखळी उपोषणाला सुरुवात केली. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक रणजित जाधव, सतीश बीडकर, रवी गावडे, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, माजी नगरसेविका सुरेखा शहा, निर्माते विजय शिंदे, नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर, राहुल राजशेखर,अवधूत जोशी रविंद्र बोरगावकर उपस्थित होते.
दरम्यान, मंगेशकरांनी ही जागा विकू नये, यासाठी कोल्हापूर महापालिकेने 2 वेळा ठराव केला होता. असे असताना नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या दोन पुत्रांनी साडेसहा कोटींना जमीन खरेदी केली. दरम्यान लतादीदींच्या निधनानंतर जयप्रभा स्टुडिओच्या जागेत त्यांचे स्मारक व्हावे, अशी कल्पना पुढे आली. याबाबत चाचपणी सुरू झाल्यानंतर जमीनीची विक्री झाल्याचे उघड झाले.