जळगाव – जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचे कंत्राट घेणारे सर्व कंत्राटदार आता एकवटले आहेत.कारण या कंत्राटदारांची सुमारे ३०० कोटींची बिले सार्वजनिक बांधकाम विभागाकडे थकलेली आहे.त्यामुळे आता ही बिले तत्काळ मिळाली नाहीत तर कामे बंद करण्याचा इशारा जळगाव जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटनेने दिला आहे.
या शासकीय कंत्राटदार संघटनेने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत निवेदन दिले.याबाबत योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.शासकीय कंत्राटदार संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात बांधकाम विभाग अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व दुरुस्ती करणे, पुल काँक्रीट रस्ते,शासकीय इमारती बांधकाम व इतर कामे केली जातात.ही कामे करणार्या कंत्राटदारांची देयके मोठया प्रमाणात प्रलंबित आहेत. या थकित बिलाचा आकडा साधारण ३०० कोटींच्या घरात आहे. दिवाळीपुर्वी प्रलंबीत देयके अदा करण्यासाठी पुरेसा निधी मिळेल अशी अपेक्षा होती.परंतू थकित देयकांच्या तुलनेत तुटपुंज्या तरतुदीनुसार अत्यल्प निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे ही खरे तर ऐन दिवाळीत कंत्राटदारांची चेष्टाच शासनाने केली आहे.सध्या कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहे. बँक बाजारपेठ-पुरवठादार इंधन कर्मचारी पगार टॅक्स साठी लाखो रुपये थकल्याने समाजात शर्मेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे.
तरी शासन स्तरावर आमची निधी मागणी करावी व जिल्ह्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन घ्यावा. मात्र निधी न मिळाल्यास नाईलाजाने संपुर्ण जिल्ह्यात काम बंद आंदोलन पुकारण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदन देताना अभिषेक कौल,राहुल सोनवणे,भुषण पाटील, राहुल तिवारी, सुनील पाटील,सुधाकर कोळी, अनिल सोनवणे,नाना सोनवणे,संदीप भोरटक्के, राजेंद्र चौधरी,मिलिंद अग्रवाल,शितल सोमवंशी, स्वप्नेश बाहेती,मनीष पाटील, प्रशांत महाजन,नितीन गोसावी, विनय बढ़े,प्रमोद नेमाडे,कैलास भोळे आदि उपस्थित होते.