संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

जळगावमध्ये शेतकर्‍यासह बँक कर्मचार्‍याची आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

जळगाव- सध्या महाराष्ट्रात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असतानां, जळगाव तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनेत दोन जणांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवल्याची घटना समोर आल्या आहेत. आग वाक्य. एका घटनेत विटनेर येथील विषप्राशन केलेल्या शेतकर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर दुसर्‍या घटनेत जळगाव शहरातील खोटेनगर येथे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटेनगर येथील रवींद्र पुंडलिक बागुल (50) या एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शिपायाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 6 वाजता समोर आली.

बँकेत नोकरीला असलेले बागुल खोटे सुरक्षा नगरात पत्नी वंदना, मुलगा ज्ञानेश्वर व मुलगी आरती यांच्यासह एकत्र राहत होते. रवींद्र बागुल यांनी सकाळी सहा वाजता गळफास घेतल्याचे आढळून आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पत्नी व मुलांनी धाव घेत त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. बागुल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. एक भाऊ पोलीस दलात नोकरीला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जळगाव तालुक्यातील विटनेर येथील शेतकरी गोकुळ पांडुरंग वराडे (49) यांनी कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन करून जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. गोकुळ वराडे मकर संक्रातीला शेतात फवारणीसाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी विषारी द्रव्य सेवन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबाने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वराडे यांनी जळके स्टेट बँक शाखेतून शेतासाठी कर्ज घेतले आहे. कर्जाच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami