संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपद निवडणुकीत संजय पवार विजयी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव :- जळगाव जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीत बंडखोर उमेदवार संजय पवार विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार यांची वर्णी लागली. संजय पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण नंतर त्यांनी बंडखोरी केली. निवडणुकीवेळी शिंदे गट, भाजप आणि ठाकरे गटाच्या एका सदस्याने त्यांना पाठिंबा दिल्याने संजय पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अमोल चिमणराव पाटील शिंदे गट यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जळगाव बँकेच्या अध्यक्षपद निवडीसाठी आज महाविकास आघाडीचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली.देवकर यांनी बँकेच्या कार्यकारी संचालकांकडे दिलेला पदाचा राजीनामा सहकार विभागातर्फे मंजूर करण्यात आला होता. संचालक मंडळाच्या बैठकीत देवकर यांचा राजीनामापत्र देण्याची सूचना सहकार विभागाकडून करण्यात आली होती. जिल्हा बँकेत महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट हे सत्तेत आहेत. सध्या जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे १०, ठाकरे गटाचे २, काँग्रेसचे ३, शिंदे गटाचे ५, भाजपचा १, असे पक्षीय बलाबल आहे. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बँकेची निवडणूक लढविण्यात आली होती. गतवर्षी शिवसेनेत फूट पडली. बँकेचे उपाध्यक्षपद ठाकरे गटाकडे आहे. उपाध्यक्षपदी आता शिंदेंच्या शिवसेनेतील अमोल पाटील निवडून आले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या