जळगाव- राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे वर्चस्व असलेल्या जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाने विजय मिळवला असून जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकूण 20 पैकी 16 जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग लावला. मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा जोरदार जल्लोष केलो.
या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आहे. एकनाथ खडसे यांनी या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा झालेला पराभव मान्य केला आहे. त्यांच्या पॅनलने फक्त चार जागांवर विजय मिळवला. ‘विरोधकांनी खोक्याची ताकद लावली आहे. त्यापर्यंत आम्ही गेलो नाही. आर्थिक बळावर विरोधकांनी ही निवडणूक जिंकली`. असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलचे तापले होते. दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच होती. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडले होते.