नवी दिल्ली – भरमसाठ वाढलेल्या महागाईने अगोदरच हवालदिल झालेल्या सामान्य नागरिकांना आता १ एप्रिलपासून गॅस दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीच्या दरात जवळपास दुप्पट वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक गॅसची अभुतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ही दरवाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय तेल कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीचे सुधारित नवे दर जाहीर करतात. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ते १०० डॉलर्स बॅरलच्या घरात गेले आहे. याशिवाय नैसर्गिक वायूच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणजे येत्या १ एप्रिलपासून सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी दुप्पट महागण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका वाहन चालक आणि दोन्ही घरगुती वापराच्या गॅस धारकांना बसणार आहे. एवढेच नाही तर वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे. कोळसा आणि गॅसवर वीज निर्मिती केली जाते. त्यांच्या खर्चात यामुळे वाढ झाल्याने वीज महागण्याची शक्यता आहे. या सर्वांचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.