रत्नागिरी : कोकण दौऱ्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित आज मनसेच्या राजापूर कार्यालयाचे उद्घाटन झाले.यावेळी काही कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. तर पैशाचे अमिष दाखवूनही मनसे कार्यकर्ते बळी पडले नाही असे म्हणत ठाकरेंनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.याशिवाय नव्या वर्षात जानेवारी महिन्यात पुन्हा कोकणात येऊन कोकणाचा विकास,हिंदूत्व या मुद्द्यांवर सविस्तर बोलणार आहे,असे राज ठाकरे यांनी सांगितले.तसेच त्यांनी रिफायनरी समर्थकांचीही भेट घेतली.
राज ठाकरे सभेला संबोधित करताना म्हणाले की, गाव तिथे शाखा सुरू करा. फोडाफोडीचे कार्यक्रम सुरू आहेत. पण महाराष्ट्र सैनिक फुटत नाही, त्याचा अभिमान आहे. पैशाचे अमिष दाखवले जात आहे. कुणाकुणाला किती ऑफर गेल्या हे मला माहीत आहे. तुमच्या या कडवट असण्याचे यशात नक्की रुपांतर होईल, असे राज ठाकरे म्हणाले.याशिवाय मुंबई आणि ठाण्यासह इतर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.सध्या निवडणुकांची पाईपलाईन तुंबली आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये ती मोकळी होईल,असे ठाकरे म्हणाले. त्यानंतर जानेवारीत पुन्हा कोकणात येणार आहे.तेव्हा कार्यक्रमाची अंमलबजावणी होते की नाही ते पाहीन,असे राज ठाकरे म्हणाले.
सिंधुदुर्गातील कार्यकारणी बरखास्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 1 ते 9 डिसेंबरच्या दरम्यान कोकण दौऱ्यावर जाण्यची घोषणा 8 दिवसांपूर्वीच करण्यात आली होती.मात्र या पूर्वनियोजित दौऱ्याची आणि बैठकीची मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काहीच कल्पना नसून त्यांना याबाबत कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राज ठाकरेंनी सिंधुदुर्गातील कार्यकारणी बरखास्त केली असून नवीन कार्यकारणी 20 डिसेंबरपर्यंत तयार केली जाईल,असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.