नवी दिल्ली- दिल्लीच्या जामिया हिंसाचार प्रकरणात साकेत न्यायालयाने शर्जिल इमामची निर्दोष मुक्तता केली . सीएए, एनआरसी कायद्याला विरोध करताना २०१९ मध्ये जामियामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शर्जिल आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यात शर्जिलला दिल्ली न्यायालयाने दोषमुक्त केले. मात्र २०२० मध्ये झालेल्या दिल्ली दंगलीप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याने त्याला कोठडीतच राहावे लागणार आहे.
२०२० च्या दिल्ली दंगलप्रकरणी कट रचल्याचा खटला सध्या शर्जिल विरोधात सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याच्याविरोधात यूएपीए लागू केले असून त्याला या प्रकरणात जामीन मिळालेला नाही. तसेच प्रक्षोभक विधाने केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अजूनही खटला सुरू आहे. ज्यामध्ये शर्जिलने भारताचे ईशान्य राज्य आसाम भारतापासून तोडण्याचे विधान केले होते असा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत असल्याने या प्रकरणात त्याच्यावर देशद्रोह आणि यूएपीएचा आरोप आहे. या प्रकरणात त्याला जामीन मिळालेला नसल्याने त्याची तुरुंगातून सुटका होऊ शकत नाही.