गांधीनगर – गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने गुरुवारी राज्यात ७ कार्यकारी अध्यक्षांची निवड जाहीर केली. त्यात दलित नेते जिग्नेश मेवाणी यांचा समावेश आहे. पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरात काँग्रेसची जबाबदारी सोनिया गांधींनी मेवाणी यांच्यावर सोपवली आहे. विशेष म्हणजे मेवाणी काँग्रेसचे सदस्य नाहीत. त्यानंतरही त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे.
गुजरात प्रदेश काँग्रेसच्या ७ कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती सोनिया गांधी यांनी गुरुवारी जाहीर केली. त्यात अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांचाही समावेश आहे. त्यांनी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व घेतलेले नाही. त्यानंतरही त्यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. आपण अपक्ष असल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार आपणास काँग्रेसचे सदस्यत्व घेता येत नाही. ते घेतले तर आमदारकी रद्द होईल. म्हणून आपण काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला नसल्याचे त्यांनी सांगितले. मेवाणी राहुल गांधींचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. येत्या डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेसचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो.