हैद्राबाद – आंध्र प्रदेशच्या गुंटूर मधील नामकरणावरून वादात असलेल्या जिन्ना टॉवरला मंगळवारी तिरंग्या प्रमाणे रंगवण्यात आला. वायएसआर काँग्रेसचे आमदार मोहम्मद मुस्तफा यांनी या टॉवरला रंग देण्याचा हा प्रयत्न केला होता. मात्र, या प्रकारानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. गेल्या महिनाभरापासून भाजपा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यात या टॉवरला तिरंग्याचा रंग देण्यात आल्याने वाद वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिना टॉवर सेंटर हे गुंटूरमधील सर्वात प्रमुख ठिकाण असून ते महात्मा गांधी रोडवर आहे.
दरम्यान, ३० डिसेंबर २०२१ रोजी, भाजपाचे राष्ट्रीय सचिव वाय. सत्य कुमार यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील जिना टॉवर सेंटरचे नाव बदलण्याचे आवाहन करणारे ट्विट केले होते. ते म्हणाले, या टॉवरचे नाव जिना आणि परिसराला जिना सेंटर असे नाव देण्यात आले आहे. हे पाकिस्तानात नाही तर आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरातील गोष्ट आहे. याठिकाणी आजही भारताच्या गद्दाराचे नाव घेतले जाते. या टॉवर आणि परिसराला डॉ. कलाम किंवा मातीचे सुपुत्र, महान दलित कवी गुर्राम जाशुवा यांचे नाव का देण्यात येऊ नये?”, असे त्यांनी म्हटले होते. या ट्वीटपासून हा वाद सुरू झाला. त्यांचे हे ट्वीट अनेक भाजपा नेत्यांनी शेअर करत नाव बदलण्याची मागणी केली होती.