मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर जी-२० परिषदेनिमित्त येणार्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी मुंबई सजली असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.मुंबई पालिकेने त्यासाठी अनेक ठिकाणी रंगरंगोटी करून वाहतुक बेटे शोभिवंत फुल झाडांनी नटवली आहेत.दक्षिण मुंबई तर पूर्णपणे चकाचक केली आहे.
जी-२० परिषदेचे सन २०२३ चे अध्यक्षपद भारतातकडे आहे.यानिमित्ताने महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह नागपुर,पुणे आणि औरंगाबाद येथे विविध बैठका होणार आहेत. याचाच एक भाग म्हणुन मुंबईत १२ ते १६ डिसेंबर या कालावधीत विविध देशांचे प्रतिनिधी येणार आहेत. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. रात्रीच्या वेळेस लखलखणार्या दिव्यांच्या प्रकाशात मरिन ड्राईव्ह परिसर उजळून निघतो. या भागात जी-२० परिषदेच्या निमित्ताने येणार्या प्रतिनिधींचे मुंबईत स्वागत आहे अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.भिंतीवर रंगीबेरंगी चित्रे काढण्यात आली आहेत.तसेच ‘वसुधैव कुटुंबकम,एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य “अशा आशयाचे घोषवाक्य लक्ष्य वेधून घेत आहेत.गिरगाव चौपाटी येथे विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे.तसेच विमानतळ ते कुलाबा ताज, हॉटेल ट्रायडंट परिसरासह मुंबईत अनेक भागात अशी ६ हजार शोभिवंत झाडे लावण्यात आली आहेत.
जी-२० परिषदेच्या वर्षभरात सुमारे २१५ विविध बैठका आणि कार्यक्रम होणार आहेत.त्यातील १४ बैठका महाराष्ट्रात होणार असून मुंबईत ८,पुणे ४ आणि औरंगाबाद व नागपूर प्रत्येकी एक असे बैठकांचे स्वरुप आहे.