रायगड – उरण तालुक्यातील जेएनपीटी येथील राज्य-संचालित कंटेनर टर्मिनलवर सायबर हल्ला झाला आहे. या अज्ञात हल्लेखोराने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे जेएनपीटी व्यवस्थापनाच्या माहिती प्रणालीवर परिणाम केला आहे. सोमवारी हा सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. जेएनपीटीचे अधिकारी सध्या हे गंभीर ऑपरेटिंग सिस्टम पुनर्संचयित करण्यासाठी काम करत आहेत. मात्र त्यांना अद्याप यश आलेले नाही. या हल्ल्यामुळे जेएनपीटी बंदराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हा हल्ला अत्यंत गंभीर बाब असून सर्व स्वयंचलित ऑपरेशन्स दीर्घकाळ थांबले आहेत. संगणक बंद पडल्याने टर्मिनल कर्मचाऱ्यांवर कागद आणि पेन घेऊन ऑफलाईन पद्धतीने काम करण्याची वेळ आला आहे. चार दिवस उलटूनही व्यवस्थापन प्रणाली पूर्ववत झाली नसून खाजगी टर्मिनल मात्र सुरळीत सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. जेएनपीटी प्रशासनाने अज्ञात हल्लेखोरा विरोधात तक्रार दाखल केली असून न्हावाशेवा पोलिसांनी आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करत हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.