मुंबई : आज क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची 132 वी पुण्यतिथी आहे. या दिवसाचे औचित्य साधत मंत्रालयात आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळही उपस्थित होते. ही तैलचित्रे मंत्रालयाच्या मुख्य इमारत प्रवेश दालनात लावण्यात आली आहेत.
मंत्रालयाच्या इमारतीत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची तैलचित्रे लावण्याची मागणी छगन भुजबळ यांनी लावून धरली होती. त्यानुसार राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतला. तर आज या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची दशसुत्री लावली होती.समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची तैलचित्रे मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आली आहेत.