मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. रात्री १ वाजता मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘गांधी’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारे सुनील शेंडे यांचा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपट,मालिका असा अभिनय प्रवास आहे.
मराठी रंगभूमीवरील सशक्त अभिनेता अशी त्यांची ओळख होती. सुनील शेंडे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातून अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खडा आवाज यामुळे पोलीस, राजकारणी अशा विविध भूमिकांमधून ते लोकांच्या लक्षात राहिले. निवडुंग, मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोर, ईश्वर तसेच सरफरोश, गांधी, वास्तव या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी केलेल्या विविध सहाय्यक भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. चित्रपटांमध्ये ते सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले. गेल्या काही काळापासून ते अभिनयापासून दूर होते. काल रात्री त्यांच्या राहत्या घरी त्यांना अचानक फिट येऊन ते पडले आणि त्यांना ताबडतोब नानावटी इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आले. तेथे गेल्यावर त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आज दुपारी वत सुनील शेंडे यांच्या पार्थिवावर पारशीवाडा याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. अभिनेत्याच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.