मुंबई :: ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाले आहे. त ९३ वर्षांचे होते. मुंबई येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेली ५० वर्षे त्यांनी रंगभूमीची सेवा केली. रंगभूमीसह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या भूमिका गाजवल्या आहेत. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये त्यांनी साकारलेली भूमिका ही विशेष गाजली होती. याशिवाय कैवारी, जावई माझा भला या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.
मोहनदास सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून अनेक वर्ष नाट्यसेवा केली. तसेच त्यांच्या नाट्य प्रवासात ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे. संस्थेत येण्यापूर्वी ते कलाकार म्हणून प्रवेश केला तर संस्थेत ‘कार्यकर्ता’च्या भूमिकेत वावरले. ‘गोवा हिंदूू’च्या विविध नाटकांचे सुमारे अडीच ते तीन हजार प्रयोग त्यांनी केले होते. संस्थेसाठी ‘कार्यकर्ता’ असल्याने सादर झालेल्या प्रयोगांसाठी त्यांनी कधीही मानधन घेतले नाही. पन्नासहून अधिक वर्ष नाट्यक्षेत्राची सेवा केल्याबद्दल मुंबईच्या आम्ही गोवेंकर या संस्थेकडून त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कैवारी, निवडुंग, पोरका, थोरली जाऊ, जन्मदाता, वाट पाहते पुनवेची, जावई माझा भला, प्रेमांकुर यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. चित्रपटाव्यतिरिक्त नाटकांमध्ये देखील त्यानी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या मराठी मालिकेतही त्यांनी काम केले. तसेच ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदी मालिकेतही त्यांनी अभिनय साकारला आहे. त्यामुळे सुखटणकरांच्या निधनाने रंगभूमी आणि सिनेमांमधला नटसम्राट काळाच्या पडद्याआड गेला अशीच भावना व्यक्त केली जात आहे.
२१ नोव्हेंबर १९३० रोजी जन्मलेल्या मोहनदास सुखटणकर मूळचे गोव्याचे. माशेल हे त्यांचे गाव. त्यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे त्या काळातील प्रख्यात वैद्य होते. सुखटणकर १९५० साली मॅट्रिकसाठी मुंबईला आले. त्यानंतर नोकरी करत असताना ते जयहिंद महाविद्यालयातून ‘अर्थशास्त्र’ विषय घेऊन ‘बी.ए.’ झाले. तसेच त्यांनी महाविद्यालयीन पातळीवरील नाट्य स्पर्धांमधून काम केले.