पुणे – ज्येष्ठ वैद्य डॉ. सुहास परचुरे यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. पुण्यात राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने आयुर्वेदाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. सुहास परचुरे हे टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पदव्युत्तर संचालक होते.डॉ. परचुरे यांनी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) ची स्थापना केली होती. निमा तसेच आयुर्वेद रासशाळाच्या राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष होते. ताराचंद धर्मार्थ आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटचे माजी व्यवस्थापकीय संचालक, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आयुर्वेद विभागाचे डीन, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य यासह अनेक पदे त्यांनी भूषवली होती. आयुर्वेद आणि रुग्णसेवेतील विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. वैद्य खडीवाले संस्था पुरस्कृत महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पुरस्कार तसेच राष्ट्रीय शिक्षण मंडळाचा जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.