नवी दिल्ली – धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून पत्रकार आणि एएलटी न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांना अटक झाली आहे. या कारवाईला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी विरोध करून निषेध केला आहे. 2020 च्या प्रकरणात उच्च न्यायालयाने संरक्षण दिले असतानाही त्यांच्यावर अटकेची कारवाई केली, असा आरोप एएलटी न्यूजचे प्रतीक सिन्हा यांनी केला. भाजपचा द्वेष, कट्टरता आणि खोटारडेपणा उघड करणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासाठी धोका आहे. सत्याच्या एका आवाजाला अटक केल्याने आणखी हजारो आवाज उठतील. सत्याचा नेहमी अत्याचारांवर विजय होतो, असे राहुल गांधी यांनी झुबेर याच्या अटकेला विरोध करताना केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे, धार्मिक भावना भडकवणे अशा आरोपांखाली दिल्ली पोलिसांनी झुबेर यांना अटक केली आहे.