डोडोमा – पूर्व आफ्रिकेतील टांझानिया देशात सध्या गूढ आणि रहस्यमय आजाराची दहशत दिसून येत आहे. सुरुवातीला ताप आल्यानंतर डोकेदुखी सुरू होऊन काही दिवसांतच त्या रुग्णाचा मृत्यू होत आहे.आतापर्यंत या अज्ञात आजारामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.तर आणखी सात जणांना या आजाराची लागण झाली आहे.
एन्फ़्लुएन्ज़ा एच ३ एन२ आणि कोरोना रुग्ण वाढत असताना आता टांझानिया देशाला या नव्या रहस्यमय आजाराने ग्रासले आहे. आतापर्यंत टांझानियातील कजेरा या भागातच हा आजार दिसून आला आहे. हा आजार नेमका कशामुळे होतोय आणि त्यावर उपाय काय करावेत याबाबत डॉक्टर अनभिज्ञ दिसत आहेत. या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला सुरुवातीला ताप येऊन तीव्र डोकेदुखी सुरू होत आहे. तसेच नाकातून रक्तही येत आहे. ही लक्षणे सुरू झाल्यानंतर काही दिवसांत रुग्णाचा मृत्यू होत आहे. टांझानियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तुमैनी नागू यांनी म्हटले आहे की,अशी लक्षणे असलेले काही रुग्ण गेल्यावर्षी सुद्धा आढळून आले होते. तरी सध्या
सरकारने सर्वत्र या आजाराच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.अशी लक्षणे आढळल्यास लोकांनी घाबरून न जाता अशा रुग्णाचा संपर्क टाळावा असे आवाहन तुमैनी नागू यांनी केले आहे.