संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

“टाटा’च्या संशोधनाला मोठे यश कमी खर्चात कॅन्सरवर मात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – टाटा मेमोरियलच्या ११ वर्षांच्या संशोधनाला मोठे यश मिळाले आहे. स्तनांच्या कर्करोगाचे लवकर निदान झालेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेपूर्वी लिग्नोकेन औषधाने भूल दिल्यास स्वस्तात आणि कायमस्वरूपी कर्करोगावर मात करणे शक्य होते, असे संशोधनात आढळले आहे. या नवीन उपचार पद्धतीमुळे गरीब कर्करुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय कर्करोगावर मात करणेही शक्य झाले आहे. भारतात स्तनांच्या कर्करोगांचे प्रमाण वाढले आहे. त्याचे लवकर निदान झाले तर शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला लिग्नोकेन औषधाच्या ठराविक मात्रेने भूल दिली तर त्याचा उपचार खर्च लाखो रुपयांनी कमी होतो. शिवाय कर्करोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी होते. ही उपचार पद्धती छोटी असली तरी ती परिणामकारक आणि प्रभावी आहे. कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता ४ टक्क्यांनी कमी होते. टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी पॅरिसमधील युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल आँकोलॉजी वैद्यकीय परिषदेत हा अभ्यास अहवाल सादर केला. तो स्तनांच्या कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण आहे. कर्क रोगावर उपचार करणाऱ्या भारतातील ११ उपचार केंद्रांवर केलेल्या ११ वर्षांच्या अभ्यासात ही नवीन उपचार पद्धती सापडली. शस्त्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात, गाठ काढून टाकण्याच्या आधी, दरम्यान किंवा नंतर लगेचच एक संधी असते. त्यावेळी रुग्णाला हे औषध मिळाले तर पुढील आयुष्यात त्याच्या शरीरात कर्करोग पसरण्याचा धोका कमी होतो, असे डॉ. बडवे यांनी सांगितले. जगभरात ही उपचार पद्धत राबवली तर दरवर्षी एक लाखांपेक्षा अधिक रुग्णांना जीवनदान शक्य आहे, असे मत त्यांनी मांडले. या नवीन उपचार पद्धतीत कर्क रुग्णाला भूलीचे औषध ठराविक प्रमाणात दिले जाते. रोगाला ते प्रतिबंधक म्हणून काम करते. त्यामुळे या उपचाराचा खर्च १०० रुपयांच्या आसपास येतो. म्हणजे लाखो रुपयांच्या खर्चाची गरज नाही. हा अभ्यास स्तनांच्या कर्क रोगावरचा प्रभावी आणि महत्त्वाचा असल्याचे सिद्ध झाले आहे. आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताने टाकलेले हे पाऊल आहे, असे टाटा मेमोरियल सेंटरचे प्रा. डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami