नवी मुंबई- मुंबई सागरी मंडळाने बेलापूर ते मांडवा ही वॉटर टॅक्सी सेवा उद्या शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेलापूर ते अलिबाग हे अंतर केवळ सव्वा तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे. या वॉटर टॅक्सीचे तिकीट ३०० आणि ४०० रुपये आहे. ही सेवा केवळ शनिवारी आणि रविवारी आहे.
वीकेंडला कोकणात जाणारे पर्यटक आणि शनिवार रविवारच्या सुट्टीनिमित्त गावी जाणारे कोकणवासी यांच्यामुळे शनिवार, रविवारी कोकणातील गाड्यांमध्ये गर्दी होते. गाड्यांची संख्या वाढल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होते. त्याचा फटका या मंडळीला बसतो. अशा परिस्थितीत पर्यटक आणि प्रवाशांसाठी वॉटर टॅक्सी हा पर्याय उपलब्ध झाला आहे. १ नोव्हेंबरला मुंबई-मांडवा अतिजलद वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली. त्यानंतर आता मुंबई सागरी मंडळ उद्या शनिवारपासून बेलापूर-मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे बेलापूर ते अलिबाग हे अंतर सव्वातासात पूर्ण करणे शक्य होणार आहे. शनिवारी आणि रविवारी ही सेवा सुरू राहणार आहे. तिचे तिकीट ३०० आणि ४०० रुपये आहे. बेलापूर जेट्टी येथून सकाळी ८ वाजता ही वॉटर टॅक्सी सुटेल व सकाळी ९.१५ वाजता मांडव्याला पोहोचेल. परतीच्या प्रवासात सायंकाळी ६ वाजता मांडवा येथून वॉटर टॅक्सी निघेल आणि रात्री ७.४५ वाजता बेलापूरला पोहोचेल. या वॉटर टॅक्सीचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाले आहे.