पुणे – पुणे सायबर पोलिसांनी म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये छापे मारून महत्वाच्या तीन एजंटना अटक केली आहे. यामध्ये लातूर परिसरातून अटक केलेल्या दोघा एंजटचा टीईटी घोटाळा प्रकरणात देखील सहभाग असल्याचे आढळून आले आहे. दोघांनी कोट्यावधी रूपये गोळा करून दिल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.तर,शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहारात आणखी एका एजंटला अटक केली आहे.
जमाल इब्राहिम पठाण ( ४७) रा. जळगपूर, ता. लातूर आणि कलीम गुलशेर खान (५२) रा. बुलढाणा यांना म्हाडा गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तर, टीईटी गैरव्यवहारात मुकुंदा जगन्नाथ सुर्यवंशी (३३) रा. नाशिक याला नाशिक येथून अटक केली आहे.त्याला न्यायालयाने २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुकुंदा सुर्यवंशी याने २०१८ च्या टीईटीमध्ये अपात्र उमेदवारांना पात्र करण्यासाठी तब्बल ८० लाख रुपये एजंट बंधूला दिल्याचे सांगितले आहे. नुकत्याच अटक केलेल्या तिघा एजंटनी उमेदवारांकडून कोट्यावधी रुपये आपसांत वाटून घेतले होते. या तिघांच्या धरपकडमुळे आणखी आर्थिक घोटाळे बाहेर येण्याची शक्यता आहे.