पुणे – पुणे विद्यापीठाची कागदपत्रे घेऊन निघालेल्या एका टेम्पोला अचानक आग लागून या आगीत टेम्पोमधील बारावीच्या प्रश्नपत्रिकासुद्धा जळून खाक झाल्या आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे.
भोपाळ येथून पुणे विद्यापीठाची गोपनीय कागदपत्रे घेऊन एक टेम्पो पुण्याकडे निघाला होता. मात्र संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी घाटाजवळ अचानक या टेम्पोला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच ड्रायव्हरने टेम्पो थांबवला आणि ड्रायव्हर व क्लीनर यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना आग विझवणे जमले नाही. त्यामुळे ही आग संपूर्ण टेम्पोत पसरली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच संगमनेर नगरपालिका आणि साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोवर आतील बहुतांश कागदपत्रे ज्यात बारावीच्या प्रश्नपत्रिकाही होत्या त्या जाळून खाक झाल्या. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्रार्थमिक चौकशीत समजले आहे. दरम्यान या आगीत जरी बारावीच्या प्रश्नपत्रिका जाळल्या असल्या तरी त्याचा ४ मार्चच्या बारावीच्या परीक्षेवर परिणाम होणार नाही असे असे पुणे उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे.