ठाणे – मुंबईसह ठाणे महानगरपालिकेच्याही निवडणुका होऊ घातल्या आहेत. एकीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या निवडणुकांवर टांगती तलवार असली, तरी देखील या निवडणुकांसाठी वातावरण मात्र चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाणे महानगर पालिकेचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना सादर केला. एकूण 3, 299 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न पालिकेकडून करण्यात आल्याची चर्चा आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पाचा आकार तब्बल 545 कोटींनी वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी 2,754 कोटी 76 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. गेल्या अर्थसंकल्पात अपेक्षित धरलेल्या उत्पन्नात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत 545 कोटींनी अर्थसंकल्प वाढला आहे. 2022-23 मध्ये खर्चासाठी तरतुदी प्रस्तावित करताना उत्पन्नातील अपेक्षित घट विचारात घेऊन जवळपास सर्वच खर्चात काटकसरीचे धोरण कायम ठेवण्यात आलेले असून केवळ अत्यावश्यक असलेले नवीन प्रकल्प वगळता हाती घेतलेल्या कामांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आल्याचे अर्थसंकल्पातून दिसून येत आहे. आजमितीस महापालिकेवर 142 कोटी 71 लाख रुपयांचे कर्ज शिल्लक आहे.
2021-22 तसेच 2022-23 च्या अंदाजपत्रकात कर्ज अपेक्षित केलेले नाही. ठाणे शहरात फिल्म इन्स्टिट्यूट उभारण्याचा महापालिकेचा मानस असून त्या माध्यमातून चित्रपटसृष्टीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी सदर अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच शहरात पुरेशी पार्किंग सुविधा निर्माण करता यावी यासाठी अर्थसंकल्पात 10 कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत हवा प्रदूषण कमी करणे व हवेची गुणवत्ता वाढणे यासाठी 48 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.