संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

ठाणे रेल्वे स्थानकात मुंबई – सोलापूर
वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा नाही!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला.मात्र यातील मुंबई-सोलापूर या रेल्वेला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आलेला नाही. वास्तविक भारतातील पहिली रेल्वे धावलेल्या या ऐतिहासिक वारसा असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता यांसदर्भात खासदार राजन विचारे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी यांना मेलद्वारे पत्र पाठवून मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा अशी मागणी केली आहे. तसेच ठाणे रेल्वे स्थानकात थांबा न मिळाल्याने त्यांनी पत्रात खेदही व्यक्त केला आहे.
या ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज ७ लाखांपेक्षा जास्त प्रवासी ये-जा करत असतात.त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या स्थानकात विविध विकासकामे सुरू आहेत. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नामुळे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानक अधिक विकसित होत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात अनेक लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना थांबा आहे. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबई येथून हजारो नागरिक ठाणे रेल्वे स्थानकातून लांब पल्ल्यांच्या गाड्या पकडण्यासाठी येत असतात. मात्र नव्याने सुरू झालेली मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वे गाडी ठाणे स्थानकात न थांबता थेट कल्याण स्थानकात थांबणार आहे.त्यामुळे रेल्वेला ठाणे स्थानकात थांबा मिळावा अशी मागणी खासदार विचारे यांनी केली आहे.१६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे अशी भारतातील पहिली रेल्वे धावली होती. विशेष म्हणजे ठाणे,नवी मुंबई शहरात सोलापूर भागातील लाखो नागरिक वास्तव्यास आहेत. या गाडीला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा मिळाला असता तर त्यांना सोयीचे झाले असते. त्यामुळे सोलापूरला जाणार्‍या प्रवाशांना कल्याणला जाण्याची गरज भासली नसती.तसेच या प्रवाशांची वेळेची बचतही झाली असती असे खासदार विचारे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या