ठाणे – ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते.ठाण्यातील शिवसेनेच्या सत्तेचे ते शिल्पकार होते. १९३४ साली जन्मलेले वसंत नारायण उर्फ योगीदास मराठे हे १९५६ सालापासून ठाण्यात राहत होते. समाजसेवेची आवड असल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थापनेपासूनच त्यांचा शिवसेनेत सहभाग होता. ठाण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वसंत मराठे हे दोन वर्ष नगराध्यक्ष आणि सहा वर्ष नगरपालिकेचे सभासद राहिले. १९७३ साली त्यांना साईबाबांनी स्वप्न दर्शन दिल्यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेऊन धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला होता. वसंत मराठे यांनी १९९९ सालापासून श्रीमद् भगवद्गीतेचा अभ्यास, मनन, चिंतन आणि प्रवचनाच्या माध्यमातून भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार हेच त्यांचे अखेरपर्यंत जीवित कार्य राहिले.
ठाण्यात शिवसेनेची पहिली सत्ता आली आणि ठाणे नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने सत्ता स्थापन केली. ठाणे नगरपालिकेत पहिला शिवसेनेचा नगराध्यक्ष वसंत मराठे यांच्या रूपाने बसला. सत्तेची पहिली संधी शिवसेनेला ठाणे नगरपालिकेने दिली. यावेळी १३ ऑगस्ट १९६७ ला ठाणे नगरपालिकेची निवडणूक झाली आणि १४ ऑगस्टला लगेच निकाल लागला. एकूण ४० जागांपैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेचे २१ उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे शिवसेना सत्तेवर येण्याचा रस्ता मोकळा झाला होता. या निवडणुकीत जनसंघाचे ८, प्रजासमाजवादीचे ३, अपक्ष ८ उमेदवार निवडून आले.