नागपूर – गेल्या काही दिवसांपासून डिजिटल करन्सीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेकजण बनावच संकेतस्थळांवर विश्वास ठेवून गुंतवणूक करत आहेत. असाच प्रकार नागपुरातून उघडकीस आला असून एका तरुणाने डिजिटल करन्सीच्या नावाखाली तब्बल ४० कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.
निशीद वासनिक या तरणाने महादेव पवार याच्यासोबत इथर ट्रेड एशिया नावाचे ऑनलाईन संकेतस्थळ बनवले होते. या माध्यातून ते लोकांना आमिष दाखवत होते. अल्पावधीत पैसे चौपट करण्याच्या आमिषाला बळी पडत अनेकांनी यात पैसे गुंतवले होते. जवळपास ४० कोटींची फसवणूक झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी पैशांसाठी तगादा लावल्यानंतर निशीद वासनिक एप्रिल २०२१ पासून फरार होता. त्याला आज पोलिसांनी पकडले आहे. अटकेवेळी त्याच्याकडून चार लक्झरी गाड्या, एक पिस्तूल, काही जिवंत काडतुसे, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कमेसह 1 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निशिद फरार असताना त्याचा साथीदार महादेव पवार याच्यासोबत वाद झाला होता. या महादेव पवारच्या साथीने संदेश लांजेवार आणि गजानन गुणगुणे यांचा शोध पोलिसांनी लावला. मात्र दरम्यान निशीदने महादेव पवारची गोळ्या झाडून हत्या केली. हत्या झाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम वाढवली. अनेक ठिकाणी छापे मारूनही त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. काही दिवसांपूर्वी त्याने मध्य प्रदेशातील पंचमढी येथे गुंतवणूकदारांसाठी एक सेमिनार आयोजित करून पुन्हा फसवणुकीचे उद्योग सुरू केल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी आपल्या हेरांचे जाळे त्याच्या अवतीभवती विणले.
या हेरांच्या माहितीवरून निशिद लोणावळ्यातील एका ड्युप्लेक्समध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून नागपूर पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने शनिवारी लोणावळ्यात छापा टाकला. यावेळी निशिद वासनिक सह त्याची पत्नी आणि अकरा जणांना पोलिसांनी अटक केली.