चंद्रपूर- माजी केंद्रीय राज्यमंत्री तसेच मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे भाऊ हितेंद्र अहीर यांचा उपचारादरम्यान डॉ. विश्वास झाडे यांच्या रुग्णालयात मृत्यू झाला. उपचारात झालेल्या निष्काळजीपणामुळे भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉ. झाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी हंसराज यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली. मात्र, या तक्रारीवरून पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.
हितेंद्र अहीर हे हंसराज यांचे लहान भाऊ होते. त्यांना १२ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना अतिशय गंभीर अवस्थेत डॉ. झाडेंच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एक महिन्यांनंतर हंसराज यांनी भावाच्या मृत्यूला डॉ. झाडे यांना जबाबदार धरले व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. माजी राज्यमंत्र्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. झाडे यांचे रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशी केली. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून जबाब नोंदवण्यात आला. “हितेंद्र अहीर यांना गंभीर अवस्थेत आणले होते. अवघ्या पाच मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला. यात माझी चूक नाही.’ असे डॉ. झाडे या प्रकरणाचा खुलासा करताना म्हणाले.