संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारोह संपन्न

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवीनता , शोध व संशोधनाची  कास सोडून केवळ इतरांचे अनुकरण केल्यामुळे देशाची पीछेहाट झाली.  मात्र नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नवीनता व नवसंशोधनावर भर देताना आंतर शाखीय अध्ययनाला महत्व दिले आहे.  केवळ विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात नवसंशोधन न होता ते कला व मानव्यशास्त्र विषयात देखील झाल्यास आज पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता असलेला भारत प्रगतीची नवी शिखरे सर करेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 

राज्य शासनाने नव्याने स्थापन केलेल्या डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचा पहिला द‍ीक्षांत समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या दीक्षांत समारोहाला राज्याचे माजी लोकायुक्त न्या. मदनलाल टहलियानी, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. राजनीश कामत, कुलसच‍िव प्रा. युवराज मलघे, संचालिका परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ विजया येवले, विज्ञान संस्थेचे संचालक डॉ जयराम खोब्रागडे, सिडनहॅम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ माधुरी कागलकर तसेच विद्यापीठाच्या विविध प्राधिकर मंडळांचे सदस्य तसेच स्नातक उपस्थित होते.

आज देशात  संपूर्ण स्वदेशी बनावटीची हेलिकॉप्टर व विमाने निर्माण होत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये देखील आमूलाग्र संशोधन होत आहे. या पार्श्वभूमीवर स्नातकांनी मोठे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून कठोर परिश्रम, निर्धार, समर्पण भावना व शिस्तीने काम केल्यास कोणतेही लक्ष्य प्राप्त करता येईल असे राज्यपालांनी सांगितले. डॉ होमी भाभा यांच्या योगदानाचा गौरव करताना विद्यार्थ्यांनी डॉ भाभा यांच्या प्रमाणे विलक्षण कार्य केल्यास पुढील २० वर्षात विद्यापीठाच्या उत्तम माजी विद्यार्थ्यांचे प्रभामंडळ तयार होईल असे राज्यपालांनी सांगितले. दीक्षांत समारंभात ४१३ स्नातकांना पदवी देण्यात आली तसेच १३ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami