- पालिकेची ८० लाखांची बचत होणार
मुंबई – मुंबई शहरातील महापालिकेच्या ६० वर्षे जुन्या डोंगरी मंडईचा आता कायापालट होणार आहे. ही मंडई दुरुस्त करण्यासाठी पालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्चाची तरतूद केली होती.पण आता हा खर्च १ कोटी २० लाखांवर आला आहे.अंदाजित खर्चापेक्षा ८० लाखांनी हा खर्च कमी झाला.कारण कंत्राटदारांनेच एव्हढ्या खर्चात काम करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
पालिकेच्या बी विभागातील ६० वर्षे जुनी मंडईची स्थिती अत्यंत खराब झाली असून यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती.त्यानुसार रेट्रो फिल्टर कन्सल्टिंग इंजिनिअर यांनी या मंडईची घटनात्मक दुरुस्ती सुचवली.त्यानुसार दुरुस्ती आवश्यकतेनुसार पॉलिमर मॉडिफाय मॉटर ट्रीटमेंट पत्रे बदलणे,गच्चीचे जलभेदीकरण,बाह्य सिमेंटच्या गिलाव्याची कामे, प्लम्बिंगची कामे,अंतर्गत व बाह्यरंग काम,विद्युत कामे व इतर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी पालिकेकडून एक कोटी ९९ लाख ६४ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.यात व्ही. जे.कॉर्पोरेशन यांनी एक कोटी २० लाखांची लघुत्तम निविदा भरल्याने त्यांना कंत्राट देण्यात आले.आता बारा महिन्यात विकासकाला हे काम पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.