हातकणंगले – कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील प्रसिद्ध चांदी उद्योजक भरत नेमिनाथ वाळवेकर हे आपल्या यळगुड येथील शेतातून घरी परतत असताना दोन अनोळखी चोरटय़ांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्या अंगावरील लाखो रुपयांचे दागिने लुटून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
नेमिनाथ वाळवेकर यांचे यळगुड येथे फार्महाऊस आहे. शुक्रवारी सायंकाळी ते याठिकाणी असलेल्या विहिरीवर माशांना खाऊ घालण्यासाठी गेले होते. तेथून ते परतत असताना वाटेत अचानक मागून आलेल्या दोन चोरटय़ांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. अचानक घडलेल्या या घटनेने नेमिनाथ हे गर्भगळित झाले. यावेळी चोरटय़ांनी त्यांच्या अंगावरील साडे सात तोळे सोन्याचे साडे तीन लाख रुपये किंमतीचे दागिने ओरबाडून लंपास केले. या चोरटय़ांनी जवळच्या उसाच्या शेतातून पोबारा केला.या दागिन्यांमध्ये नवग्रहाची सोन्याची अंगठी आणि दुसरी एक साठ ग्रामची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे.या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान,पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा पंचनामा केला.दरम्यान, सकाळी कोल्हापूरहून श्वान पथकास करण्यात आले होते.मात्र श्वान घटनास्थळीच घुटमळले.घटनास्थळ,तसेच आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयितांचा शोध घेतला जात आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी,उपनिरीक्षक मस्कर करत आहेत.