मुंबई – मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यावरून शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांना फक्त महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येच काम आहे. बाकी आख्खा देश रिकामाच आहे. सगळं काही ठीक ठाक आहे. घेऊ द्या शोध… ढूंढते रह जाओगे.
राऊत म्हणाले की, केंद्र सरकारला वाटतंय की इन्कम फक्त महाराष्ट्रातच आहे. सर्वाधिक टॅक्स मुंबई आणि महाराष्ट्रच देतो. महाराष्ट्राच्या लोकांना अशा प्रकारे त्रास देणं, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून छळ करणं याची नोंद महाराष्ट्रातली जनता घेतेय. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अशा प्रकारे बदनामीची मोहीम सुरू आहे. फार काळ हे चालणार नाही. आमचं लक्ष आहे. आम्ही हा त्रास सहन करायला तयार आहोत. पण महाराष्ट्र वाकणार नाही.