देहू – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. तब्बल २४ वर्षांनंतर पवारांनी तुकारामांच्या मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी तेथील विठ्लाचेही दर्शन घेतले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यातील प्रसंगचित्रण दिनदर्शिका अनावरण सोहळा पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांचा तुकाराम पगडी घालून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या. ”मी देव-दानव यापासून लांब असतो पण, काही देवस्थान अशी आहेत, जी अंत:करणात आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेगाव आहे. आळंदी देहूत आल्यानंतर मानसिक समाधान मिळते,” असे पवार या कार्यक्रमात म्हणाले. ”मागच्या ४०० वर्षात समाजात बदल घडवण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले. ४०० वर्ष त्यांनी समाजाला योग्य दिशा दिली, त्यामुळे इतर कोणाचे नाव घ्यायचे काही कारण नाही.” ”मोरे घराणे हे मूळ घराणे आहे, त्यांनी सुचवले की, संतांच्या जीवनावर आधारित दूरचित्रवाणी दाखवा. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी येत्या आठवड्यात मी त्यांना बोलावले आहे. दूरचित्रवाणीद्वारे इतिहास पोहोचवण्याची पावले उचलूयात,” असेही ते यावेळी म्हणाले.