संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 30 January 2023

तब्बल ६ महिने चालणारा कोल्हापूरचा
फुटबॉल हंगाम येत्या ४ डिसेंबरपासून

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर – कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाचे बिगुल वाजले आहे.कतार येथे सुरू झालेल्या फुटबॉल विश्वचषकापाठोपाठ कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाचे किक ऑफ ४ डिसेंबरपासून होत आहे. फुटबॉल हंगामासाठीची प्रतीक्षा आता संपली आहे. कतार येथे फुटबॉल विश्वचषकामुळे संपूर्ण शहरातील वातावरण फुटबॉलमय झाले आहे. यातच तब्बल ६ महिने चालणार्‍या कोल्हापूरच्या या फुटबॉल हंगामाला सुरुवात होत असून यंदाचा हंगाम हाय व्होल्टेज ठरणार आहे. या हंगामासाठी १६ संघांनी जय्यत तयारी केली असून, प्रत्येक संघाचा जोरदार सराव सुरू आहे.
कोरोनानंतर कोल्हापुरातील या स्पर्धेमध्ये २४ परदेशी खेळाडू खेळत असून २१ खेळाडूंचा समावेश विविध संघांत केला आहे.सीनियर सुपर ८ व सुपर ८ अशा दोन गटांतर्गत दररोज दोन असे एकूण ५६ सामने होणार आहेत.सहा महिन्यांपर्यंत चालणाऱ्या या मोसमात अनेक परदेशी खेळाडू कोल्हापुरात घराघरात पोहोचले आहेत. गेल्या दोन वर्षात निर्बंधांमुळे कोल्हापूर क्लबने एकाही परदेशी खेळाडूला संघात घेतले नव्हते.जिल्ह्यातील सर्वोच्च क्रीडा संस्था असलेली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूरच्या बाहेरील जास्तीत जास्त तीन खेळाडूंना प्रवेश देण्यास परवानगी देते.यापैकी दोन परदेशी असू शकतात.
तर साखळी सामने कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनमार्फत सुरुवातीला खेळवले जातील आणि नंतर पात्र संघ बाद फेरीत लढतील.प्रथम सामने या असोसिएशनद्वारे आयोजित केले जातात आणि नंतर अनेक शीर्षक प्रायोजकांद्वारे स्पर्धा आयोजित केल्या जातात.
कोल्हापूरमध्ये फुटबाॅल चाहत्यांनी विशेष करून रोनाल्डो,मेस्सी,नेमारचे कटआऊट बॅनर लावले आहेत.कोल्हापूर जिल्ह्याला फुटबाॅलची पंढरी समजली जाते.मंगळवार पेठेतील गुलाब गल्लीत वर्ल्डकपमध्ये सहभागी असणाऱ्या देशांच्या पताका लावण्यात आल्या आहेत.सायबर चौकात लावलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कटआऊटने चांगलेच लक्ष वेधले आहे.कटआऊटला कट्टर ख्रिस्तियानो साहेब समर्थक कोल्हापूर असे नाव दिल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.कोल्हापूरमध्ये रोनाल्डो,मेस्सी आणि नेमारचे हजारो फॅन आहेत. लिओनेल मेस्सीचे बॅनरही चर्चेचा विषय आहे. रोनाल्डोच्या बॅनरसोबत सेल्फी घेण्यासाठी अनेक फुटबाॅल शौकिन गर्दी करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami