ठाणे : ठाणे स्टेशन रोड परिसरात महिलेच्या विनयभंगाची एक धक्कादायक घटना समोर आली. छेडछाड करत असलेल्या मुजोर रिक्षाचालक तरुणाला विरोध केल्याने तरुणीला चक्क रिक्षासह फरफटत नेल्याची घटना ठाण्यात घडली. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यांनंतर आता या रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे.या घटनेबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सकाळी कॉलेजला जात होती. त्यावेळी एका दारूच्या नशेत असणाऱ्या रिक्षा चालकाने त्या तरुणीचा विनयभंग केल्याचे समजते. तरुणी कॉलेजला जात असताना रिक्षाचालक तिथे आला आणि त्याने तरुणीला इशारे करत तिची छेडछाड काढली. तरुणीने त्याला विरोध केला असता त्याने त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकाला तरुणीने पकडण्याचा प्रयत्न केला. रिक्षात बसलेल्या रिक्षाचालकाची कॉलर धरुन त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षाचालकाने रिक्षा सुरु करत तरुणीला फरफटत नेले असता तरुणी जखमी झाली.या घटनेनंतर रिक्षा चालकाने तेथूळ पळ काढला. याप्रकरणी रिक्षा चालक फरार झाला होता. त्यानंतर पोलीसांनी शोध घेतला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला. त्यानंतर रिक्षा चालकाविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात छेडछाड आणि विनयभंग असा गुन्हा दाखल करण्यात आला.अखेर ठाणे नगर पोलीसांकडून आरोपीला अटक करण्यात आले.