मुंबई – मुंबईची लाईफलाईन पश्चिम आणि मध्य रेल्वेची सेवा आज सकाळी कोलमडली. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना आणि शाळा कॉलेजला निघालेल्या विद्यार्थ्यांना लेटमार्कचा भुर्दंड सहन करावा लागला. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी-जोगेश्वरी रेल्वे स्थानकात दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे जलद लोकलची सेवा विस्कळीत झाली होती. तर मालगाडीमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक सकाळपासून कोलमडले. त्यात लोकल विलंबाने धावत होत्या. अनेक लोकल रद्द झाल्या. त्याचा फटका प्रवाशांना बसला.
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि जोगेश्वरी या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळी जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन जलद लोकल सेवा विस्कळीत झाली. सकाळीच लोकल सेवा कोलमंडल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले. त्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे लोकल आणि उपनगरी स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली होती. लोकलचे वेळापत्रक कोलमंडल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसला. मध्य रेल्वेच्या लोकलही सकाळपासूनच १५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यात अनेक लोकल रद्द झाल्या. सकाळीच मध्य रेल्वेची सेवा ढेपाळल्यामुळे त्याचा फटका चाकरमान्यांना बसला. त्यांना कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचता आले नाही. त्यामुळे त्यांना लेटमार्कचा भुर्दंड बसला. मध्य रेल्वेच्या कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत होत्या. कसाऱ्याकडे जाणारी मालगाडी उशिराने धावल्यामुळे तिचा फटका मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला बसला. लोकलचे वेळापत्रक कोलमडले, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.