मुंबई – ताडदेव परिसरातील भाटीया रुग्णालयासमोरील २० मजली असलेल्या कमला इमारतीच्या १८ व्या मजल्यावर भीषण आगीची घटनाघ गेल्या महिन्यात २२ जानेवारी घडली होती. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला होता तर २० जण जखमी झाले होते. यावेळी या आगीत इमारतीची संपूर्ण वीज यंत्रणा वितळून नष्ट झाली होती.त्यामुळे येथील सर्व रहिवाशी बेघर झाले आहेत. त्यांना आणखी दोन महिने तरी घराबाहेर इतर नातेवाईक किंवा भाड्याने खोली घेऊन राहावे लागणार आहे.
आगीमुळे जळून खाक झालेली वीज यंत्रणा पुन्हा नव्याने उभारण्यासाठी आणखी दोन महिने तरी लागणार आहेत.तसेच या इमारतीतील वीज वाहिन्यांचे काम करण्यासाठी भरमसाठ खर्चही येणार आहे.त्यातच सध्या या इमारतीमध्ये सोसायटी स्थापन केलेली असल्यामुळे या इमारतीचा बिल्डर या प्रकरणात लक्ष घालण्यास बांधील नसल्याचे सांगत आहे.तसेच या सोसायटीचे काही पदाधिकारी अद्याप रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.त्यामुळे रहिवाशीच त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.वीज जोडणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या रहीवाशांना या इमार्तीतीत राहण्यास जाता येणार नाही. हे रहिवाशी १५ दिवसांपासून बाहेर आश्रयाला आहेत.त्यांना आता आणखी काही महिने बाहेरच राहावे लागणार आहे,अशी शक्यता पालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड व्यक्त केली आहे.दरम्यान, या इमारत आग दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ.इक्बाल चहल यांनी परिमंडल दोन चे उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे.