मुंबई – मुंबई मेट्रोसाठी उभारल्या जाणाऱ्या कायमस्वरूपी कारशेडचा प्रश्न अजूनही जैसे थे असला तरी मरोळ- मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडचे कामही अद्याप अपूर्ण स्थितीत आहे. त्यामुळे मेट्रो ३ ची चाचणी लांबणीवर पडली आहे. विशेष म्हणजे मेट्रो ३ साठीची पहिली गाडी श्रीसीटी येथे तयार असूनही तात्पुरते कारशेड तयार नसल्याने ही गाडी मुंबईत आणणे अशक्य बनले आहे.
मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ या ३२.५ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये भूयारीकर्ण ९७ टक्के, बांधकाम ८२ टक्के, रुळाचे काम २२ टक्के आणि स्थानकाची कामे ७९ टक्के पूर्ण झाली आहेत. एकंदर ही कामे वेगाने सुरू असली तरी कायमस्वरूपी कारशेडचा प्रश्न काही सुटण्याच्या मार्गावर दिसत नाही. त्यामुळे तात्पुरत्या कारशेडचा पर्याय पुढे आला. मात्र ते कामही साथ गतीने चालल्याने मेट्रो ३ ची चाचणी अधांतरी राहिली आहे. वास्तविक या कारशेडला परवानगी मिळाल्यानंतर तिचे बांधकाम डिसेंबर २०२१ पूर्ण होईल आणि जानेवारी २०२२ मध्ये चाचणी घेतली जाईल असे मुंबई मेट्रो प्रशासनाने घोषित केले होते. मात्र आता फेब्रुवारी महिना उजाडला तरी हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे चाचणीसाठी गाडी आणली तर कुठे उभी करायची असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे हे काम कधी पूर्ण केले जाईल हेसुद्धा ठामपणे सांगता येणार नसल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी म्हणत आहेत.