नवी दिल्ली- तिहार जेलमधील आपचे नेते सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते तुरुंगात बाहेरचे जेवण, फळे आणि ड्रायफूटवर ताव मारताना दिसतात. यावरून भाजपचे नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी केजरीवालांच्या आम आदमी पार्टीवर निशाणा साधला आहे. जैन तुरुंगात नाहीत तर रिसॉर्टमध्ये आहेत, असा घणाघाती आरोप भाजपने आपवर केला आहे.
दिल्लीच्या केजरीवाल मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन तिहार जेलमध्ये आहेत. तेथे त्यांना मिळणाऱ्या सुविधांवरून भाजप आम आदमी पार्टीवर टीकास्त्र सोडत आहे. यापूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी सत्येंद्र जैन यांचे मसाज करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात जैन बेडवर कागद अंथरूण जेवताना दिसतात. बाहेरचे जेवण, फळे आणि सुकामेवा ते आरामात खाताना दिसतात. त्यामुळे ते तुरुंगात आहेत, असे कोणालाही वाटत नाही. एखाद्या रिसॉर्टप्रमाणे ते जेवणावर ताव मारतात. यामुळे त्यांचे वजन घटलेले नाही तर ८ किलो वाढले आहे. जैन यांच्या वकिलांनी न्यायालयात केलेल्या दाव्यात त्यांचे वजन २८ किलो कमी झाल्याचे म्हटले होते. ५ महिन्यांपासून त्यांना त्यांच्या धर्मानुसार जेवण मिळत नसल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा खळबळ माजली आहे. भाजपच्या नेत्यांनी यावरून केजरीवालावर निशाना साधला आहे.