संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

तुमच्या राज्यात जगायची मला इच्छा नाही, सरकारला निरोप पोचवा; अण्णा नाराज

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदनगर – राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उद्या सोमवारपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार होते. मात्र अण्णा यांनी उपोषण करू नये असा निर्णय आज एकमताने ग्रामसभेत घेण्यात आला. अण्णा हजारेंचे वय पाहता राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी त्यांना उपोषण न करण्याचा सल्ला दिला. त्याचाच भाग म्हणून आज अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये घेतलेल्या ग्रामसभेत सर्वांनी हात वर करुन अण्णा हजारेंना उपोषण न करण्याची विनंती केली. त्यानंतर अण्णा हजारेेंनी उपोषण तीन महिने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेत असतानाच त्यांनी तुमच्या राज्यात जगायची मला इच्छा नसल्याची खंतही व्यक्त केली.

अण्णा हजारे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन म्हटले की, तुम्ही वाईन का आणता… आणि अशा प्रकारे खुल्या बाजारात तुम्ही विक्री करायला ठेवताय. म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचे नाही. सरकारला हा निरोप पोहोचवा. हा प्रश्न राळेगणचा नाही आहे तर राज्याचा आहे. अरे वाईन ही काय आपली संस्कृती आहे का? आयुष्य बरबाद करायला निघालेत. म्हणून जगायची इच्छा होत नाही. 84 वर्षे खूप झाली. मी जगून घेतले. आता जगायची इच्छा नाही, अशा प्रकारचा निर्णय सरकार घेत आहे. वाईन विकण्याला जनतेची मान्यता नाही मग मंत्रिमंडळाने मान्यता कशी दिली, परमीट रूम कमी आहेत का? मग सुपरमार्केटमध्ये कशाला? वाईन ही संस्कृती आहे का? व्यसनाने लोकांची आयुष्ये उध्वस्त झाली आहेत. काय होणार मुलांचे, महिलांचे? मी गाव, समाजाची सेवा करत मरायचे ठरवले आहे. प्रत्येक गावागावात ग्रामसभा होणे गरजेचे आहे. सरकारने जनतेच्या आरोग्याविषयी घातक निर्णय घेतला तर आंदोलन करू असे प्रत्येक ग्रामसभेने ठरवले पाहिजे. भले जेल मध्ये जावे लागले तरी चालेल. तीन महिन्यात जनतेची मते घ्या. जर लोकांनी विरोध केला तर निर्णय रद्द करा, असे अण्णा हजारे म्हणाले.

अण्णा हजारे पुढे बोलताना म्हणाले की, काल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव मला भेटायला आल्या होत्या. मी त्यांना सांगितले, तुम्हाला हा निर्णय घ्यायचाच होता तर तुम्ही आधी जनतेचे मत विचारात घ्यायला हवे होते. त्यांनी सांगितले, तुमच्या मताप्रमाणे आम्ही वाईन विक्रीचा जो काही निर्णय जनतेला विचारल्याशिवाय घेणार नाही. मी त्यांना सांगितले, मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय जनतेसमोर ठेवा आणि जनतेने जर परवानगी दिली तर तुम्ही विचार करा, नाहीतर नाही. रद्द करा. लोकशाहीत जनता प्रमुख आहे.

सचिवांनी लेखी पत्र दिले की, यापुढे आम्ही जो निर्णय घेऊ तो नागरिकांना विचारुन घेऊ, ही लोकशाही आहे. शेवटी आपण ग्रामसभेची मान्यता घेतो. मी वेळोवेळी जनतेच्या हितासाठी, समाजाची सेवा करत राहणार आहे. सरकारने आश्वासन दिले आहे की, आम्ही जनतेला विचारल्या शिवाय निर्णय घेणार नाही. मला ग्रामसभेला विचारायचे आहे की, सरकारने लेखी दिले आहे की आम्ही वाईन विक्रीचा निर्णय जनतेला विचारल्या शिवाय घेणार नाही. आता मला ग्रामसभेला विचारायचे आहे की, उद्याचे माझे उपोषण होणार आहे हे तुम्हाला मान्य नसेल तर हात वर करुन सांगा तुम्हाला माझे उपोषण मान्य नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami