अंकारा: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या ७.८ तीव्रतेच्या भूकंपानंतर आतापर्यंत सुमारे २८,००० लोक मरण पावले आहेत, ६,००० इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत आणि शेकडो लोक या भूकंपाचे अजूनही होणारे झटके सहन करत आहेत. पण या संपूर्ण विध्वंसाच्या काळात एका घराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले २ महिन्यांचे बालक तब्बल १२८ तासांनंतर जिवंत सापडले आहे. ढिगाऱ्याखालून या बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. याचा एक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुर्कीत आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या २८,००० पर्यंत पोहोचली आहे. ७०,००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि लाखो लोक बेघर झाले आहेत. हेते प्रॉविंस येथे एका ढिगाऱ्याखालून १२८ तासांनंतर २ महिन्यांच्या बाळाची सुटका करण्यात आली आहे. हा एक चमत्कार मानला जात आहे. या बाळाचा एक व्हिडिओ जगभर व्हायरल झाला आहे. त्या बाळाला घेतलेल्या व्यक्तीचा अंगठा हे बाळ चोखताना या व्हिडिओत दिसत होते.
भूकंपानंतर पाच दिवसांनी सुटका करण्यात आलेल्यांमध्ये दोन वर्षांची मुलगी, सहा महिन्यांची गर्भवती महिला आणि ७० वर्षीय महिलेचा समावेश असल्याचे तुर्की माध्यमांकडून सांगण्यात आले आहे. भूकंपांनंतर इथली परिस्थिती भयावह आहे. हजारो बचाव पथके अजूनही भूकंपग्रस्त भागात ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या लाखो लोकांना आता खाण्यासाठी, पिण्यासाठी आणि स्वतःचा थंडीपासून बचाव करायचा आहे. आणि त्यासाठी त्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.