संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

तुळजाभवानी देवीच्या ७ पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेशबंदीची कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातील ७ पूजाऱ्यांवर मंदिर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. भोपे पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे तुळजापूर शहर प्रमुख सुधीर किसनराव कदम-परमेश्वर यांच्यासह ४ पूजाऱ्यांना प्रत्येकी ६ महिने मंदिर प्रवेशबंदी केली असून इतर ३ पूजाऱ्यांना प्रत्येकी ३ महिने मंदिर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यात पुजारी सुधीर कदम यांना २ वेगवेगळ्या प्रकरणात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

आई तुळजाभवानीच्या मंदिरात बेशिस्त वर्तन, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत प्रशासकीय कामात अडथळा आणणे, पाळी नसताना देवीच्या गाभाऱ्यात पुजाऱ्यांनी अनधिकृत प्रवेश करणे यासह भविकांनी देवीस अर्पण करण्यासाठी दिलेल्या सोन्याच्या नथीवर आणि रोख रक्कमेवर डल्ला मारल्याप्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानाने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह दुपारी दीडच्या सुमारास देवीच्या दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी सुरक्षा निरीक्षकांना सुधीर कदम व इतर ३ पुजारी चोपदार दरवाजा उघडण्यास सांगत होते. मात्र चावी न दिल्याने त्यांनी खासदार साहेबांना कुंकू लावायचे आहे त्यामुळे चावी द्या, असे सांगत सुरक्षारक्षकांना दमदाटी करून चावी घेऊन कुलूप उघडले. त्यानंतर खासदारांना आत घेऊन गेल्यानंतर मंदिर गाभाऱ्यात व चोपदार दरवाज्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात नेऊन पुजा केल्यामुळे ४ पूजाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याआधारे या ४ जणांवर कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने मंदिर संस्थानचे तहसीलदार यांनी हे आदेश काढले आहेत.

आदेशानुसार, तुळजाभवानी मंदिरातील पुजारी सुधीर कदम-परमेश्वर, विनोद सुनील कदम-सोंजी, गजानन किरण कदम व सचिन वसंतराव अमृतराव या ४ पूजाऱ्यांना देऊळ कवायत कलम २४ व २५ प्रमाणे पुढील ६ महिन्यांसाठी मंदिर प्रवेशबंदी करण्यात आली असून मंदिर प्रवेशबंदी पुढील १२ महिन्यांपर्यंत कायम का ठेवण्यात येऊ नये याचा खुलासा ७ दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुजारी सागर गणेश कदम, ओंकार हेमंत इंगळे व अरविंद अण्णासाहेब भोसले या ३ पूजाऱ्यांना प्रत्येकी ३ महिने मंदिर प्रवेशबंदी केली असून प्रवेशबंदी पुढील ६ महिने कायम का करण्यात येऊ नये याचा खुलासा ७ दिवसांत मागितला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami