संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 02 December 2022

तेलंगणाचे मुख्यमंत्री राष्ट्रीय राजकारणात नव्या ‘भारत राष्ट्र समिती” पक्षाची स्थापना

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हैदराबाद- तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. बुधवारी दुपारी केसीआर यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षाची घोषणा केली.कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी यावेळी हजेरी लावली होती. मागील २१ वर्षांपासून केसीआर तेलंगणा राष्ट्र समितीच्या माध्यमातून तेलंगणा राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. मागील काही दिवसांपासून भाजपविरोधात विरोधक एकवटले आहेत.यामध्ये केसीआर यांचे नाव आघाडीवर आहे.

केसीआर यांनीही भाजपच्या विरोधात आवाज उठवला होता.त्यांनी दिल्लीमध्ये विरोधकांच्या भेटी घेत एकत्र येण्याचं आवाहन केले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना केसीआर यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.त्यावेळी भाजपविरोधातील भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर केसीआर यांनी राष्ट्रीय राजकारण प्रवेश केला आहे. बुधवारी दुपारी एक वाजून १९ मिनिटांनी केसीआर यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षाची घोषणा करत राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रीय पक्षाची घोषणा करताना केसीआर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करणार असल्याचे स्पष्ट केले.केसीआर यांनी देशातील सर्वच विरोधी पक्षाला भाजपविरोधात एकवटण्याचे आवाहन केले. मागील वर्षभरात केसीआर यांनी भाजपविरोधात अनेक वक्तव्य करत आपला इरादा स्पष्ट केला होता.

केसीआर यांनी बीआरएस पक्षाला राष्ट्रीय पक्ष घोषीत केले आहे,पण तुर्तास निवडणूक आयोगाकडून अद्याप पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली नाही.कारण,एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी कमीत कमी चार राज्यात अस्तित्वात असणे गरजेचे आहे. कोणत्याही चार राज्यात लोकसभा निवडणूकीत सहा टक्के मते मिळवावी लागतील अथवा पक्षाला तीन राज्यात लोकसभा निवडणुकीत दोन टक्के जागा जिंकाव्या लागतील. केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचे नेते विनोद कुमार म्हणाले की,कोणताही पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याशिवाय निवडणूक आयोगाला सूचना देऊन अन्य राज्यात निवडणुका लढवू शकतो.त्यामुळे आमचाही पक्ष निवडणूक आयोगाला सूचना देऊन अन्य राज्यात निवडणूक लढवणार आहे.दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, केसीआर यांचा पक्ष २०२४ लोकसभा निवडणुकीत अन्य राज्यातही मैदानात उतरणार आहे. पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना केसीआर म्हणाले की,भारत राष्ट्र समिती राष्ट्रीय स्तरावर भाजपचा पर्याय म्हणून उदयास येईल.२०२४ मध्ये भाजप आणि बीआरएस या दोघांमध्ये थेट लढत होईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami