नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्याने शेंगदाणा तेलाच्या किमतीमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे पहायला मिळाले. मोहरी तेलाच्या दरातही घट झाली. अर्थात मोहरीसोबतच सोयाबीन आणि शेंगदाणा तेलाच्या किमती देखील घसरल्या. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार जानेवारीपासून सातत्याने मोहरीच्या तेलाच्या दरात चढ उतार पहायला मिळत आहे. या पूढील काळात देखील तेलाच्या किमतीमध्ये चढ-उतार कायम राहिल, तसेच, पुढील महिन्यात मोहरीचे नवे पीक तयार होत असल्याने मोहरीच्या तेलाचे दर काही प्रमाणात कमी होऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजापेठ बंद असल्याने शेंगदाणा तेलाच्या किमतीवर त्याचा परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. सोबतच राजस्थानमधून सोयाबीनची आवक वाढल्याने सोयाबीन तेलाच्या दरात देखील घट झाली. बाजारपेठ तज्ज्ञांच्या मतानुसार सध्या अंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद आहे. बाजारपेठ बंद असल्यामुळे काही प्रमाणात तेलाच्या किमती घसरल्याचे पहायला मिळत आहे. मात्र ही परिस्थिती कायम राहणार नसून, काही दिवसानंतर तेलाच्या दरामध्ये तेजी येण्याचे संकेत आहेत. परदेशी बाजारात सध्या पाम तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच भारतात देखील सोयाबीन, सुर्यफूल आणि शेंगदाण्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात तेलाचे दर वाढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
यंदा राज्यासह देशातील सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीनला अतिवृष्टीचा फटका बसल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सोयाबीनचे उत्पन्न घटल्यामुळे सोयाबीन तेलाच्या दरात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मालाची आवक घटल्याने सोयाबीनचे दर देखील वाढले आहेत. उन्हाळी सोयाबीन तयार होईपर्यंत सोयाबीनच्या दरात तेजी कायम राहू शकते.